कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे लता मंगेशकर यांची इमारत सील


मुंबई – देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निवासस्थान मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचा शिरकाव झाला असून गेल्या आठवड्यात प्रभुकुंज सोसायटीत पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने लता मंगेशकर यांची इमारत सील केली आहे. या इमारतीत अधिक प्रमाणात वयोवृद्ध व्यक्ती राहत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने खबरदारी म्हणून ही इमारत शनिवारी रात्री सील केली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होतच आहे, पण कोरोनाचे केंद्रस्थान ठरलेल्या मुंबईमधील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभुकुंज सोसायटीत पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली. लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर प्रभुकुंज सोसायटीत वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीदेखील राहतात. मुंबई महानगरपालिकेकडून ही संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार आहे. त्याशिवाय सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे.

लता मंगेशकर आणि कुटुंबीयांची सोसायटी सील केल्याची बातमी समजताच विचारपूस करणारे फोन येई लागल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली. या परिपत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, आज संध्याकाळपासून आम्हाला प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणे गरजेचे आहे.