Good News! ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे काऊंटडाऊन सुरु!


संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटात जगभरातील नागरिकांना काही अंशी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. त्यानुसार कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनाला देखील ब्रिटनमध्ये वेग आला असून वैज्ञानिकांचा हिरवा सिग्नल मिळताच कोरोना प्रतिबंधक लस ब्रिटनच्या लोकांना कमी वेळात मिळेल अशी व्यवस्था केली जात आहे. जगभरासाठी ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची ही कोरोना प्रतिबंधक लस वरदान ठरण्याची शक्यता आहे. कारण शेवटच्या टप्प्यात या लसीची चाचणी पोहचली आहे. यासंदर्भात express.co.uk मध्ये छापून आलेल्या एका माहितीनुसार कोरोना प्रतिबंधक लस पुढील 42 दिवसांत म्हणजेच सहा आठवड्यात तयार होण्याची शक्यता आहे.

संडे एक्स्प्रेसला ब्रिटन सरकारच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि इंपेरिअल कॉलेज लंडनचे संशोधक कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या एकदम जवळ पोहोचले असून ब्रिटनमधील मंत्री अद्याप यावर काही बोलण्यास तयार नसून ते लसीच्या तयारीच्या कामाला लागले आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी सर्वात चांगल्या स्थितीत म्हणजेच 6 आठवड्यांत पूर्ण होऊ शकते. जर असे झाले तर ते गेम चेंजर ठरणार आहे. लसीच्या तयारीशी जोडले गेलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, आणखी काही कालावधी जर लागला तरीही आम्ही म्हणू शकतो की संशोधक खूप जवळ पोहोचले आहेत. यानंतर लाखो डोसची गरज लागणार आहे, त्यानुसार त्याच्या उत्पादनाची तयारी केली आहे.

ब्रिटेनच्या लसीच्या टास्कफोर्सच्या प्रमुख केट बिंघम यांनी सांगितले की, आम्ही कोरोना प्रतिबंधक लसीला घेऊन सावध आणि आशावादी आहोत. त्यावर अजून काम करत रहावे लागणार असल्यामुळे घाईघाईत उत्सव करण्याचे प्रयत्न करू नयेत. लसीच्या चाचणीचे निकाल ख्रिसमसच्या आधीच हाती येणार आहेत. ही लस लवकरात लवकर बाजारात येण्य़ासाठी ब्रिटन कायद्यामध्येच बदल करणार असल्यामुळे कमीतकमी वेळात या लसीला मंजुरी दिली जाणार आहे.

कोणतीही लस यशस्वी झाली की तिच्या मंजुरी आणि परवान्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. जर कोरोनावरील लस सुरक्षा चाचणीमध्ये यशस्वी झाली तर या लसीला लगेचच मंजुरी दिली जाईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी अनेक देशांमध्ये सुरु असून यामध्ये ब्रिटनसह ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील जवळपास 20000 स्वयंसेवकांचा समावेश आहे.