ब्लॅक पँथरला ‘अमुल’ची अनोखी श्रद्धांजली


गेल्या चार वर्षांपासून कर्करोगामुळे त्रस्त असलेल्या सुपरहिरो ‘ब्लॅक पँथर’ फेम अभिनेता चॅडविक बोसमन याचे वयाच्या ४३ वर्षी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. दरम्यान ‘किंग ऑफ वकांडा’ला आपल्या अनोख्या शैलीत अमुलने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सोशल मीडियावर अमुलने पोस्ट केलेले हे कार्टून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लॉस एंजलिस येथील आपल्या राहत्या घरी बॉसमनने अखेरचा श्वास घेतला. त्याची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य यावेळी त्याच्यासोबत होते. कोलोन कॅन्सरने बोसमन हा त्रस्त होता. ते खरच एक लढवैय्ये होते. चॅडविक यांनी संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. प्रेक्षकांनीही या चित्रपटांवर भरभरुन प्रेम केले. बोसमन यांनी गेल्या चार वर्षांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती, असे बोसमनच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

हॉलिवूड सिनेसृष्टीतील चॅडविक बोसमन एक नामांकित अभिनेता होता. तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात ‘किंग ऑफ वकांडा – ब्लॅक पँथर’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे आला होता. ऑस्कर पुरस्कार देखील ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने पटकावला होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चॅडविकने जगाचा निरोप घेतला. परिणामी चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.