कॉपी-पेस्टवर लगाम घालणार ट्विटर, घेतला मोठा निर्णय

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर आपल्या युजर्सला चांगली सेवा देण्यासाठी नवनवीन फीचर आणत असते. आता ट्विटरने एक मोठा निर्णय घेतला असून, यामुळे पक्ष आणि संस्थांसाठी काम करणाऱ्या असंख्य आयटी सेलची अडचण वाढू शकते. ट्विटरने आता कॉपी-पेस्ट केलेल्या ट्विटला हाईड करणार आहे. एकच ट्विट कॉपी करून अनेकजण ट्विट करत असतात, अशा युजर्सचे ट्विट टाईमलाईनवर कमी वेळा दिसेल.

ट्विटरने यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहे. ट्विटरने म्हटले की, मागील काही वर्षांमध्ये प्लॅटफॉर्मवर कॉपी-पेस्ट करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकाच ट्विटला अनेकजण कॉपी करून पुन्हा ट्विट करतात. अशा ट्विट्सची व्हिजिबिलिटी कमी केली जाईल, म्हणजे हे ट्विट्स युजर्सला कमी वेळा दिसेल.

ट्विटरने यासाठी मोबाईल अ‍ॅपमध्ये एक खास फीचर देखील दिले आहे. ज्याद्वारे युजर्सला आपल्या ट्विटला कॉपी करण्याचा पर्याय बंद करू शकतात. कंपनीने नुकतेच ‘Retweet with quote’ फीचर देखील जारी केले आहे. अनेकदा प्रोपगंडा पसरविण्यासाठी एकच माहिती अनेकजण कॉपी करून असंख्य अकाउंटवरून पोस्ट केली जाते. ट्विटरच्या या नवीन नियमामुळे यावर लगाम बसेल.