कोरोनानंतर CSK ला आणखी एक धक्का, या स्टार खेळाडूची आयपीएलमधून माघार

कोरोना संकटात खेळल्या जाणाऱ्या यंदाच्या आयपीएलला कोरोनानंतर आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैनाने खाजगी कारणांमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. रैनाच्या भारतात परतण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ यूएईला पोहचले आहेत. दुबईला पोहचल्यानंतर सीएसकेच्या 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यात एका गोलंदाजाचा देखील समावेश आहे. त्यानंतर आता सुरेश रैनाने माघार घेतल्याने, सीएसकेला दुहेरी धक्का बसला आहे.

संघाचे सीईओ केएस विश्वनाथन यांच्यावतीने चेन्नईच्या अधिकृत ट्विटवर हँडलवरून ट्विट करत माहिती देण्यात आली की, खाजगी कारणामुळे सुरेश रैना भारतात परतला असून, आयपीएलच्या संपुर्ण सत्रासाठी तो उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्स या काळात सुरेश आणि त्याच्या कुटुंबासोबत आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएलमध्ये तो चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक होता. मात्र आता खाजगी कारणामुळे त्याने माघार घेतली आहे.