WHO चा धक्कादायक इशारा, हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट, मृत्यूदरही वाढेल

जगभरात कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये या आजारावरील लस शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चेतावणी दिली आहे की येणाऱ्या हिवाळ्यात यूरोपसह जगभरातील अनेक भागात कोरोनाची मोठी लाट येईल. संघटनेने म्हटले आहे की या काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या वाढेल व मृत्यू दरात देखील वाढ होईल.

यूरोपमधील डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग म्हणाले की, हिवाळ्यात तरुणांच्या तुलनेत वृद्धांना हा आजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आम्ही कोणतीही अनावश्यक भविष्यवाणी करत नाही आहोत. मात्र निश्चितच असे होण्याची शक्यता आहे.

यूरोपमधील डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग यांनी येणाऱ्या  महिन्यात 3 मुख्य कारणांवर लक्ष देण्यास सांगितले आहे. यात शाळा पुन्हा सुरू करणे, हिवाळा आणि हिवाळ्यात होणाऱ्या वृद्धांच्या मृत्यूचा समावेश आहे. या कारणांमुळे संसर्ग अधिक घातक होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, जगभरातील देशांनी या चेतावणीनुसार आताच तयारी सुरू करायला हवी. अमेरिकेत शाळा आणि कॉलेज सुरू केल्याने अनेक ठिकाणी संसर्ग पसरल्याचे समोर आले आहे.

डबल्यूएचओने सांगितले की, त्यांनी एक कमेटी बनवली आहे. जी आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यासंदर्भातील नियम तयार करेल. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी संघटनेने ठोस पावले न उचलल्याची टीका जगभरातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे.