कोरोनाची सुरुवात झालेल्या वुहान शहरात उघडणार शाळा

चीनच्या वुहान शहरात उद्रेक झालेल्या कोरोना व्हायरस महामारीने जगभरात थैमान घातले. या आजारामुळे लोकांचे आयुष्य पुर्णपणे बदलून गेले, तर लाखो लोकांचा मृत्यू देखील झाला. मात्र आता या शहरात स्थिती पुन्हा पुर्वपदावर येताना दिसत असून, येथील शाळा पुन्हा उघडणार आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, वुहान आपल्या सर्व शाळा आणि किंडरगार्डनला पुन्हा सुरू करत आहे. वुहानमधील जवळपास 2482 शैक्षणिक संस्थेमध्ये 1.4 मिलियन विद्यार्थी शिकतात. वुहान यूनिव्हर्सिटीला देखील उघडण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाईन शिक्षणात परतण्यासाठी इमर्जेंसी योजना तैयार आहेत. विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे की शाळेत येताना व बाहेर जाताना मास्क वापरावा आणि शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक टाळावी. शाळांना रोग नियंत्रण उपकरणांचा साठा करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. अनावश्यक सामूहिक कार्यक्रम घेणे टाळण्यास सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ज्या परदेशी विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत परतण्याची नोटीस पाठवण्यात आलेली नाही, त्यांना परतण्याची परवानगी नाही. चीनच्या या शहराला कोरोनाच्या उत्पत्तीचे केंद्र मानले जाते. या शहरात कोरोनामुळे जवळपास 3869 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.