… म्हणून भाजपच्या नियंत्रणात आहे व्हॉट्सअ‍ॅप, राहुल गांधींचा गंभीर आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोदी सरकारचे नियंत्रण असल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी टाईम मॅग्झिनचा संदर्भ देत, व्हॉट्सअ‍ॅपला भारतात पेमेंट सेवा देखील सुरू करायची आहे. यासाठी सरकारच्या मंजुरीची गरज आहे. अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅप हे भाजपच्या नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवसांपुर्वी राहुल गांधींनी द वॉल स्ट्रीट जर्नलचे वृत्त शेअर करत दावा केला होता की, द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर फेसबुकने भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित काही ग्रुपबाबत नरमाईची भूमिका घेतली होती.

आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोदी सरकारचे नियंत्रण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले की, अमेरिकेच्या टाईम मॅग्झिनने व्हॉट्सअ‍ॅप-भाजपच्या परस्पर संबंधांचा खुलासा केला आहे. भारतात 40 कोटी युजर्स असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपला भारतात पेमेंट सेवा सुरू करायची आहे व यासाठी मोदी सरकारच्या परवानगीची गरज आहे. यामुळे भाजपचे व्हॉट्सअ‍ॅपवर नियंत्रण आहे.