सुशांत प्रकरणात चौकशी होत असलेल्या संदीप सिंहचा भाजपशी संबंध काय? काँग्रेसकडून चौकशीची मागणी


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यापासून या तपासादरम्यान आता दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच या प्रकरणावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. अशातच आता अंमली पदार्थांसंदर्भातील या प्रकरणामधील खुलाशानंतर अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सुशांतला अंमली पदार्थ सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती, मित्र संदीप सिंह यांनी दिल्याचा आरोप काही व्हॉट्सअपवरील संवादांचा आधार घेत केला जात आहे. आता भाजप आमदार राम कदम यांनी अंमली पदार्थांच्या विषयावरुन बॉलिवूडमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात कदम यांनी पत्र पाठवले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो ट्विट केला आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी याच फोटोवर रिप्लाय करताना माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत राज्य सरकारने या प्रकरणामध्ये भाजप अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.

तुमच्यापर्यंत बॉलिवुडमधील अंमली पदार्थ्यांच्या सेवनासंदर्भातील चर्चा पोहचलीच असेल. मी तुम्हाला याच पार्श्वभूमीवर विनंती करतो की अंमली पदार्थांचे बॉलीवुडमधील कलाकारांकडून सेवन केले जात असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करुन हे रॅकेट उद्धवस्त करावे. आदर्श म्हणून बॉलिवूडमधील कलाकारांकडे पाहिले जाते. याचा दिर्घकालीन परिणाम टीव्ही, चित्रपट आणि सोशल मिडियावरील तरुणांवर होईल, असे वाटत असल्याचे म्हणत आगामी अधिवेशनामध्ये सभागृहात या प्रकरणाबद्दल चर्चा घडवून आणावी, तसेच सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, असे राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सचिन सावंत यांनी हेच ट्विट रिट्विट करत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती करतो की या प्रकरणामधील भाजप अँगलकडेही पहावे. संदीप सिंहची सीबीआयकडून सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थांसंदर्भात चौकशी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा संदीप सिंह हा निर्माता होता. फडणवीस यांच्या हस्ते ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाल्याचे, सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटबरोबर त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. संदीप सिंह, देवेंद्र फडणवीस, चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय या फोटोंमध्ये एकाच मंचावर उभे असल्याचे दिसत आहे.

दरम्यान आज पुण्यामध्ये कोवीड सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सावंत यांनी केलेल्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. सचिन सावंत यांचे राज्य आहे ना, मग सगळ्यांना त्यांच्या मुंबई पोलिसांनी दूर का ठेवले. कोणाची चौकशी का केली नाही. पहिल्या दिवसापासून आत्महत्या का सांगितले? फक्त माझ्या फोटोचा विषय नाही. ते डायरेक्टर असल्याने त्या कार्यक्रमात मी असेन. पण बाळासाहेबांवर बनणाऱ्या चित्रपटाचे तीच व्यक्ती डायरेक्टर किंवा प्रोड्यूसर होती, याची देखील न्यूज आहे. अलीकडच्या काळात सचिन सावंत अभ्यास करत नाहीत. विधान परिषेदवर त्यांना पाठवत नसल्यामुळे ते निराश होऊन बोलतात, अशा शब्दामध्ये फडणवीस यांनी सावंत यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.