‘ही’ भारतीय कंपनी करणार प्लाझ्मा लसीची निर्मिती; लवकरच होणार मानवी चाचणी


नवी दिल्ली – संपूर्ण जगाला कोरोना या दुष्ट संकटाने घातलेला विळखा आणखीच घट्टच होत असल्याचे चित्र सध्या आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचदरम्यान या रोगाचा समूळ नायनाट व्हावा यासाठी प्रत्येक देशाचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नात भारत आघाडीवर आहे.

दरम्यान, देशातील पहिली प्लाझ्मा लसीच्या मानवी चाचणीला पुढील महिन्याभरात इंटास फार्मा सुरूवात करणार आहे. यासंदर्भातील वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले आहे. कोरोनाचा प्रतिबंध करणारे औषध अथवा लस कोणत्याही देशाला सापडलेले नाही. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये या रोगावरील प्रतिबंधक लसीवर संशोधन सुरु आहे. तर काही देशांनी या रोगाला रोखणारे औषध तयार केल्याचा दावा केला आहे. तर रोगाविरोधातील लढ्यात प्लाझ्मा थेरेपी मोलाची भूमिका बजावत असल्याचे समोर आले होते.

याचदरम्यान प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर देशातील फार्मा कंपनी इंटास फार्माने काम सुरू केले आहे. ही लस रुग्णाला दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे. देशात अशाप्रकारची कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणारी पहिली लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. ही लस पूर्णत: स्वदेशी असून हायपरिम्युन ग्लोब्युलिनला (Hyperimmune Globullin) ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. याची वैद्यकीय चाचणी गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत केली जाईल, अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.

या लसीच्या मानवी चाचणीला पुढील महिन्याभरात सुरूवात होणार आहे. मानवी प्लाझ्मापासूनच ही लस तयार झाली असल्यामुळे महिन्याभराच्या आतच याचे निकाल समोर येतील. या लसीसाठी प्रमाणपत्र घेणे आणि त्याच्या उत्पादनाच्या पूर्ण प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचे डॉ. चतुर्वेदी म्हणाले.