प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देणार जपानचे पंतप्रधान


टोकियो: प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून शिंजो आजारी असून रुग्णालयात त्यांना अनेकदा दाखल करावे लागते. त्यामुळेच पंतप्रधान पदाचा आबे राजीनामा देणार आहेत. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा त्यांच्याकडून केली जाऊ शकते. गेल्या आठवड्याभरात शिंजो आबे यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आबे राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येताच जपानचा शेअर बाजार कोसळला.

यासंदर्भात जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आबे यांची प्रकृती ठीक असली तरी त्यांना वारंवार उपचारांसाठी रुग्णालयात जावे लागत असल्यामुळे शेअर बाजारावर याचा परिणाम झाला आहे. आबे लवकरच प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त जपानमधील माध्यमांनी दिले आहे. आबे यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सात तास त्यांच्यावर उपचार झाले. सप्टेंबर २०२१ पर्यंत आबे यांचा कार्यकाळ आहे.

मागील ८ वर्षांपासून आबे पंतप्रधानपदी कायम आहेत. आबे यांच्या नावावर सर्वाधिक काळ जपानचे नेतृत्त्व करण्याचा विक्रम जमा आहे. त्यातच जपानमध्ये आबे यांच्याबद्दल कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नीट हाताळता न आल्याने नाराजी निर्माण झालेली असल्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. घोटाळ्यांचे आरोप त्यांच्या पक्षावर झाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचे आश्वासन ६५ वर्षीय आबे यांनी दिले होते. आबे यांच्याकडून चीनपासून असलेला धोका लक्षात घेता सैन्याला सुसज्ज ठेवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.