सीतारमण यांच्या ‘Act of God’ वर राहुल गांधींचा निशाणा, म्हणाले, ‘या’ 3 कारणांमुळे उध्वस्त झाली अर्थव्यवस्था

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंताजनक स्थितीत असलेल्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशावर ओढावलेले संकट म्हणजे Act of God असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था यंदाही आकुंचन पावणार असल्याचे म्हटले होते. सीतारमण यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला.

उध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीला सरकारचे 3 निर्णय जबाबदार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विट केले की, भारतीय अर्थव्यवस्था 3 कारणांमुळे उध्वस्त झाली – नोटबंदी, दोषपुर्ण जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन.

याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व खोटे असल्याचे म्हणत, त्यांनी सीतारमण यांच्या वक्तव्यावर टीका केली.

दरम्यान, जीएसटी काउसिंलच्या बैठकीत राज्य सरकारांनी केंद्रासमोर जीएसटी कलेक्शनचा मुद्दा उपस्थित केला. बैठकीत सीतारमण यांनी अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसच्या रुपात Act of God चा सामना करत असल्याचे म्हणत राज्यांना जीएसटीची थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे कबूल केले.