पुणेकरांनो मास्कचे भान पाळा, अन्यथा हजार रुपये दंड भरा


पुणे : देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्यातच देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनत आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारी अग्रस्थानी असलेल्या मुंबईला मागे ढकलत पुण्यांना अव्वल स्थान काबिज केले आहे.

पण राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील अनेक उद्योगधंदे शिथिलता देऊन सुरु करण्यात येत आहेत. त्याचमुळे राज्यातील नागरिकांची अशी चुकीची धारणा झाली आहे कि कोरोनाचे संकट टळले आहे आणि त्यांनी मास्कचा वापर करणेच सोडले आहे. पण पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात मास्क अनिवार्य असून त्याचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारण्याबाबतचा विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथे आटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्धाटन झाले. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर उषा ढोरे, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्वांनी कोरोनाच्या विरोधात एकत्र येऊन लढले पाहिजे. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. येथील नागरिकांना किफायतशीर दरात उपचार मिळाला पाहिजे. ग्रामीण भागदेखील आपलाच असल्यामुळे या कोविड सेंटरमध्ये खेड, जुन्नर, शिरूर, मावळ यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देखील रुग्ण दाखल केले जातील. कोरोनाविरूद्धच्या या लढाईत सातत्य टिकवले तरच रुग्ण आढळण्याचा आलेख आपण खाली उतरवू शकू.

त्याचबरोबर अजित पवार यांनी यावेळी अव्वाच्यासव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश दिले असून एक लाखांपेक्षा जास्तीचे बिल असल्यास त्याची पडताळणी करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. त्यासाठी एक समिती नियुक्त केल्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होत असल्याचे म्हटले आहे.

अजित पवार कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या भाषणात बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रात काही भागात मास्कचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यांना मास्क बंधनकारक केले पाहिजे. याबाबत दुपारी पुणे येथे बैठक होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकरण्याचा विचार सुरू असून त्याबाबत या बैठकीत चर्चा करू, असे देखील पवार यांनी म्हटले आहे.