चीनमध्येही लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर नरेंद्र मोदी


जुन महिन्यात चीन ड्रॅगनने लडाखमधील गलवाण खोऱ्यात भारताचा विश्वासघात करत भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात अद्याप चीनविरोधातील रोष कायम आहे. त्याचबरोबर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. याचदरम्यान चायना इन्स्टिट्यूट ऑफ केंटेंपरेररी इंटरनॅशनल रिलेशन्ससोबत एकत्र येत चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने एक सर्वेक्षण केले होते.

१९६० जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चायना इन्स्टिट्यूट ऑफ केंटेंपरेररी इंटरनॅशनल रिलेशन्ससोबत एकत्र येत मोदी सरकारपासून ते भारतीय लष्कर, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारत-चीन संबंधांबाबत अनेक प्रश्नांवर एक सर्वेक्षण केले होते. दरम्यान, यातील ७० टक्के लोकांनी भारत चीनप्रती अधिक शत्रूत्व दाखवत असल्याचे म्हटले. तसेच याविरोधात चीनने कारवाई केल्यास त्याचे समर्थन करणार असल्याचेही नमूद केले.

तर दूसरीकडे या सर्वेक्षणात मोदी सरकारप्रती तब्बल ५१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर ९० टक्के लोकांनी भारताविरोधातील चीनच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले. मोदी सरकारला चीनमधील नागरिकांनी पसंती दर्शवल्याचा भाग ग्लोबल टाईम्सने काढून टाकला होता. पण सर्वेक्षणाचा काही भाग ग्लोबल टाईम्सने ट्विट केला होता. त्यात अद्यापही यासंदर्भातील काही माहिती उपलब्ध आहे.

दरम्यान, भारताने भविष्यात सीमावाद निर्माण केल्यास सुरक्षेसाठी कारवाई करण्यासाठी ९० टक्के लोकांनी आपली सहमती दर्शवली आहे. तर दुसरीकडे भारत हा शेजारी देश असल्यामुळे आवडत्या देशांच्या यादीत २६.४ टक्के लोकांनी भारताला चौथा क्रमांक दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतापूर्वी रशिया, पाकिस्तान आणि जपान या देशांना चिनी नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. हे सर्वेक्षण १७ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान करण्यात आले. चीनमधील बीजिंग, शांघाय, शियान, वुहान, चेंगडू, झेंगझाऊ यांसह १० देशांमध्ये ग्लोबल टाईम्सने सर्वेक्षण केले.

भारतीय संस्कृतीबाबत चीनमधील नागरिकांना चांगली माहिती नसल्याचे मानले जाते. परंतु या सर्वेक्षणातून वेगळीच माहिती समोर आली. भारतीय संस्कृतीची चीनमधील ५६ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना चांगली तर १६ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना सर्वाधिक माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांनी आपल्याला जेवढी माहिती आहे हे सांगितले ते तथ्यापासून विपरीत आहे. अमेरिका, जपान आणि युरोपबाबत चीनमधील लोकांना भारतापेक्षा अधिक माहिती आहे. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्याही फरक आहे आणि नागरिकांमधील परस्पर संवादही कमी असल्याचे सेंटर फॉर स्टडिज ऑफ फूडान यूनिव्हर्सिटीचे उपसंचालक लिन मिनवांगने ग्लोबल टाईम्सशी बोलताना सांगितले.

चीनच्या चांगल्या शेजारी राष्ट्रांमध्ये दक्षिण कोरियापेक्षा चांगल स्थान भारताला देण्यात आले आहे. दरम्यान, भारतातील सरकार देशातील लोकांना चीनविरोधात भडकवत असल्याचा आरोपही ग्लोबल टाईम्सने केला आहे. चीन आणि भारतादरम्यान अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. पण चीनमध्ये अनेक बॉलिवूडचे चित्रपट लोकप्रिय आहेत. अनेक चिनी नागरिक योग करतात. सर्वेक्षणात २३ टक्के लोकांनी भारताला योगाशी जोडून पाहिल्याचेही सांगण्यात आले आहे.

भारत-चीनदरम्यानच्या संबंधांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून २५ टक्के लोकांनी पाहिले. पुढील काळात दोन्ही देशांमधील संबंध उत्तम होतील, असेही त्यांचे म्हणणे आहे. तर ७० टक्के लोकांनी भारत गरजेपेक्षा अधिक शत्रूत्व दाखवत असल्याचे म्हटले आहे.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भारत चीनसाठी धोकादायक ठरू शकणार नसल्याचे ५७ टक्के लोकांनी म्हटले. तर ४९ टक्के लोकांनी भारतीय अर्थव्यवस्था चीनवर अवलंबून असल्याचा दावा केला. सर्वेक्षणात ५४ टक्के लोकांनी भारत चीनला मागे टाकू शकत नसल्याचे म्हटले. तर हे १०० वर्षांनी होऊ शकेल, असे १०.४ टक्के लोकांनी म्हटले.