आयआयटी विद्यार्थ्यांची कमाल! एका चार्जिंगमध्ये मुंबई ते दिल्ली अंतर कापेल अशा बॅटरीचे संशोधन


कोणतेही इंधन असो ते पर्यावरणाला हानिकारकच आहे, गाडीत वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे निर्माण होणारे प्रदुषण हा जगासाठी नेहमीच चर्चेचा विषय आहे. त्याचमुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर जोर देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण या इलेक्ट्रीक गाड्या विकत घेण सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नसल्यामुळे अडचण होते. तसेच देशभरात म्हणावे तेवढ्या मुबलक प्रमाणात चार्जिंग स्टेशनही उपलब्ध नाहीत. अशा अनंत अडचणींमुळे इलेक्ट्रीक वाहनांचा काळ येण्यास अद्याप खूप काळ लोटावा लागणार आहे. पण आयआयटी मुंबई (IIT) आणि शिव नादर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यावर असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे, ज्यामुळे ही बॅटरी असलेले वाहन एका चार्जिंगमध्ये तब्बल 1600 किमीचे अंतर पार करु शकणार आहे.

सध्याच्या घडीला ह्युंदाईकडे 1000 किमीचे अंतर पार करु शकणारी कार आहे. पण टाटा, महिंद्रासारख्या इतर अन्य कंपन्यांकडे 100 किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्या कार आहेत. त्यातच टाटाची नेक्सॉन ही इलेक्ट्रीक 300 किमी अंतर कापू शकते. पण त्यानंतर याक्षेत्रात अद्याप इतर कोणतेही तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. पण आयआयटीने विकसित केलेल्या या नव्या तंत्रज्ञानात या बॅटरींमध्ये लिथिअम आयन वापरले जाते. त्याचबरोबर यात पर्यावरणाला पूरक असे लिथियम-सल्फरच्या (Li-S) बॅटरींचे उत्पादन घेतले जाऊ शकते.

यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार लिथिअम आयनच्या तुलनेत तिप्पट ऊर्जा देणारी बॅटरी संशोधकांनी तयार केली आहे. पेट्रोलियम रसायनची उत्पादने जसे की सल्फर, कृषी टाकाऊ वस्तू आदींच्या वापरातून ही Li-S बॅटरी बनविण्यात येऊ शकते. याबाबत माहिती देताना शिव नादर विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक बिमलेश लोखब यांनी सांगितले की, एक उपाय शोधण्यासाठी हरित रसायन विज्ञानाच्या सिद्धांताला हे संशोधन केंद्रीत करते. याद्वारे बनविलेली बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह सुरक्षा व स्वच्छ स्रोत आहे.

सध्याच्या घडीला एखादे वाहन एका चार्जिंगमध्ये 400 किमीचे अंतर पार करत असेल, तर एका चार्जिंगवर या बॅटरीची कार 1600 किमी अंतर कापेल. म्हणजेच एका चार्जिंगमध्ये ही कार मुंबई ते दिल्ली अंतर सहज पार करु शकेल. वाहन निर्मात्या कंपन्यांच्या या बॅटरीवर निश्चितच उड्या पडणार आहेत. कारण एवढी मोठी रेंज देणारे तंत्रज्ञान सध्या कोणत्याही कंपनीकडे नाही. तसेच भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजाराची मागणी लक्षात घेता उद्या अशा प्रकारच्या बॅटरीलाच मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे.