टीक-टॉकचे सीईओ केव्हिन मेयर यांचा राजीनामा

चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन मेयर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील अनेक आठवड्यांपासून अमेरिकेत टीक-टॉकवर बंदी घालण्याविषयी चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की कंपनीने आपला अमेरिकेतील व्यवसाय विकावा अन्यथा अ‍ॅपवर बंदी घातली जाईल. यामुळेच केव्हिन मेयर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. केव्हिन मेयर हे 4 महिन्यांपुर्वीच टीक-टॉकचे सीईओ झाले होते. याआधी ते डिग्नीमध्ये एग्झिक्यूटिव्ह होते.

केव्हिन मेयर म्हणाले की, मागील काही आठवड्यात राजकीय वातावरण खूप बदलले आहे. ज्या बदलांची गरज होती व ज्यासाठी मला ग्लोबल रोलमध्ये ठेवण्यात आले होते, ते मी केले.

टिक-टॉकचे जीएम व्हॅनेसा पाप्पस अंतरिम सीईओ म्हणून केव्हिन मेयर यांची जागा घेतील. केव्हिन हे टिक-टॉकचे सीईओ आणि टिक-टॉकची पॅरेंट कंपनी बाईट डान्सचे सीओओ होते. ते थेट बाईट डान्सचे संस्थापक आणि सीईओ यिमिंग झांग यांना रिपोर्ट करत असे.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी 90 दिवसांच्या आत टिकटॉकला आपला अमेरिकन व्यवसाय विकण्याचा इशारा दिला होता. अन्यथा टिक-टॉकवर बंदी घातली जाईल असेही म्हटले होते. तर दुसरीकडे टिक-टॉकने आपले अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भारताने देखील बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅपमध्ये टिक-टॉकचा देखील समावेश आहे.