धक्कादायक; पंजाबमधील तब्बल 25 टक्के आमदार कोरोनाबाधित


नवी दिल्ली – संपूर्ण देशाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलेले असतानाच पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबमधील एक.. दोन.. नव्हे तर तब्बल 30 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. 117 एवढी पंजाब विधानसभेतील एकूण सदस्यांची संख्या असून त्यापैकी तब्बल 25% आमदार कोरोनाबाधित आढळले आहेत. देशातील एकूण राज्यांमध्ये असलेल्या विधानसभांपैकी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा झाल्याची ही पहिलीच घटना आहे. यासंदर्भातील माहिती पंजाब विधिमंडळाने गुरुवारी दिली आहे.

यासंदर्भात पंजाब विधानसभेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित असलेल्या एकूण 30 आमदारांपैकी 7 जण रुग्णालयात उपचार घेतल्यावर बरे झाले आहेत. तर उर्वरित आमदार अद्यापही कोरोनाबाधित आहेत. हे आमदार कोरोनाबाधित असल्यामुळे त्यांना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. तसेच, या सर्व आमदारांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

पंजाबमधील ग्रामीण विकासमंत्री तृप्त राजिंदर बाजवा हे पहिले कोरोनाबाधित मंत्री होते. त्यांनी वेळीच उपचार घेतल्यामुळे आणि काही काळ क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर ते पूर्ण बरे झाले. मंत्री बाजवा हे पुन्हा एकदा आपल्या कामावर रुजु झाले आहेत. दरम्यान, तृप्त राजिंदर बाजवा यांच्यानंतर कारागृह मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा, महसूल मंत्री गुरप्रीत कांगर आणि उद्योग मंत्री श्याम सुंदर अरोडा यांचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी बुधवारी सांगितले की, पंजाबमध्ये एकूण 117 आमदारांपैकी 23 जण आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झाले आहेत.