बळीराजाला एसबीआयच्या या अँपद्वारे खरेदी करता येणार बियाणे

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी योनो कृषी अ‍ॅप लाँच केले. हे अ‍ॅप भारतीय कृषी संशोधन परिषदच्या अंतर्गत येणारी भारतीय बागायती संशोधन संस्था (IIHR) आणि भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) अ‍ॅपचे एकीकरण करण्यात आले आहे. यावेळी एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार उपस्थित होते. दोन्ही अ‍ॅपच्या विलिनिकरणामुळे देशातील शेतकरी आता डिजिटल माध्यमातून बियाणे खरेदी करणे व इतर सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील.

यावेळी केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, कृषिचे क्षेत्र आव्हानात्मक राहिलेले आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांचे अथक परिश्रम व वैज्ञानिकांचे संशोधन, सरकारी धोरणामुळे हे क्षेत्र देशात सर्वाधिक महत्त्वाचे आहे. देशातील खाद्य उत्पानांसोबतच जीडीपीतील योगदानामध्ये देखील कृषिचे क्षेत्र महत्त्वाचे आहे.

बियाणे पोर्टल आणि योनो कृषी अ‍ॅपचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. संस्थेद्वारे प्रमाणित बियाणे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचावी व ज्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न वाढेल, हा यामागील उद्देश आहे.

योनो कृषी अ‍ॅप हिंदी, इंग्रजीसह 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये कृषी मंडी व कृषी मित्रसह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. बँकेच्या लाखो शेतकरी ग्राहकासह, देशातील इतर शेतकरी देखील या सेवेचा लाभ घेऊ शकतील. हे अ‍ॅप वापरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.