‘तारक मेहता’तील रोशनसिंह सोढीची जागा घेणार ‘हा’ कलाकार


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असलेल्या तारक मेहता का उल्ट चष्मा या मालिकेला सध्या अजबच ग्रहण लागले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण काही दिवसांपूर्वी तारक मेहताची पत्नी अंजली मेहताने (नेहा मेहता) हिने मालिका सोडल्याचे वृत्त आम्ही तुम्हाला दिले होते. पण तिच्या आधी या मालिकेतील आणखी एक महत्वपूर्ण पात्र असलेल्या रोशन सिंह सोढी अर्थात गुरुचरण सिंह याने देखील मालिकेला रामराम ठोकला होता.

गुरुचरण सिंह याने मालिका सोडल्यानंतर आता त्याची व्यक्तिरेखा अभिनेते बलविंदर सिंह सूरी साकारणार आहेत. दरम्यान सोशल मीडियात हे वृत्त झळकताच नेटकऱ्यांनी आणि या मालिकेच्या चाहत्यांनी बलविंदर सिंह आणि गुरुचरण सिंह यांची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. आता त्यावर बलविंदर सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

नुकतीच एका वृत्तवाहिनीला बलविंदर सिंह यांनी मुलाखत दिली. त्यांनी या मुलाखतीमध्ये ‘गुरुचरण सिंह आणि मी एकमेकांना आधीपासून ओळखतो. मला तो माझ्या भावासारखा असून मला ही भूमिका साकारण्यासाठी त्याच्यामुळे आत्मविश्वास मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरुचरण सिंह आणि त्यांची तुलना करण्यावर ते म्हणाले, जर कोणी माझी तुलना करत असेल, तर मी अजिबात घाबरत नाही. मला या भूमिकेची ऑफर मिळाली आहे, तर नक्कीच मी माझे १०० टक्के योगदान देऊन ती योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.

दरम्यान शोचे निर्माते असित मोदी यांच्याविषयी देखील त्यांनी वक्तव्य केले आहे. असित मोदी यांच्यासोबत या आधी देखील मी काम केले आहे. १९९९ प्रदर्शित झालेल्या ये दुनिया है रंगीन या शोमध्ये आम्ही एकत्र काम केले होते. हा शो वर्षभर सुरु होता. असित आणि माझी त्यावेळी मैत्री झाली आणि आज तारक मेहतामध्ये काम करणे म्हणजे माझ्याच कुटुंबात परतल्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.