रिझर्व्ह बँकेने दिले व्याजदरातील कपातीचे संकेत


नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकने आज व्याजदारातील कपातीचे संकेत देण्यासोबतच कोरोनाच्या संकट काळात अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना हटवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे की, दरात कपात असो वा अन्य धोरणात्मक पावले, आमच्या भात्यातील बाण अद्याप संपलेले नाही.

6 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या रेपो दरात आरबीआयने कोणताही बदल केलेला नाही. केंद्रीय बँकेने मागील दोन बैठकींमध्ये यापूर्वी धोरण दर 1.15 टक्क्यांनी कपात केली होती. सध्या रेपो दर चार टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा (एमसीएफ) दर 4.25 टक्के आहेत.

ते म्हणाले की, कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला बळकटीच्या मार्गावर आणण्यासाठी सावधगिरीने पुढे जावे लागेल. केंद्रीय बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या मदत उपायांबाबत दास म्हणाले, आरबीआय कोरोना संकटाच्या केलेल्या उपाययोजना एवढ्यात मागे घेईल, असे आपण ग्राह्य धरु नका.

ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबींबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर आरबीआय महागाई आणि आर्थिक वृद्धीबाबत आपला अंदाज वर्तवू शकेल. ते पुढे म्हणाले की, एकंदरीत बँकिंग क्षेत्र मजबूत व स्थिर आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनीकरण ही योग्य दिशेने एक पाऊल आहे.

दास म्हणाले, बँकांचे आकारमान महत्त्वपूर्ण आहे, परंतु कार्यक्षमता त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. बँकांना ताणतणावाचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बँका आव्हानांना कसे तोंड देतात आणि त्याचा कशा प्रकार सामना करतात.