राऊत यांच्याकडून फडणवीसांचे जाहिर कौतुक; देवेंद्र फडणवीस यांची इतिहासात नक्कीच नोंद होईल


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचे जाहिर कौतुक करत देवेंद्र फडणवीस हे एक सर्वोत्तम विरोधी पक्षनेता असून त्यांच्या एवढा सक्षम विरोधी पक्षनेता पाहिला नसल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस यांनी आपले मत मांडले असून राजकीय नेते असल्यामुळे मतभिन्नता असू शकते, असे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना सांगितले की, फडणवीस यांनी आपले मत मांडले आहे. राजकीय नेते असल्यामुळे मतभिन्नता असू शकते. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, जी लोकांपर्यंत पोहोचली आहे. फडणवीसांबद्दल मवाळ भूमिका घेण्यावरुन संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, या देशात त्यांच्या एवढा सक्षम विरोधीपक्ष नेता पाहिलेला नाही. त्यांचे नाव इतिहासात उत्तम विरोधीपक्ष नेता म्हणून नक्की लिहिले जाईल, याची खात्री आहे.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला घाबरायचे की विरोधात लढायचे असे ठरवा सांगितले. आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राने चमक दाखवायला पाहिजे. शरद पवार हे काम करत आहेत, पण त्यांच्यासोबत सर्वांनीच केले पाहिजे, असेही यावेळी ते म्हणाले

कधीही आडपडदा ठेवून उद्धव ठाकरे बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरे असे त्यांचे कधीच नसते. केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना उद्धव ठाकरेंनी बिगरभाजप राज्यांना आवाहन केले आहे. या सगळ्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना, मला सध्या तरी दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.