सावधान…! जिओमार्टच्या नावाखाली होत आहे फसवणूक

जिओमार्टची फ्रेंचाईजी देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर कंपनीने आता अलर्ट केले आहे. लोक अशा ठगांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी कंपनीने एक नोटीस जारी केली आहे. नोटीसमध्ये कंपनीने लोकांना सूचना केली की जिओमार्टच्या नावाखाली बनावट वेबसाईट बनवून लोकांना फ्रेंचाईजी किंवा डीलरशीप देण्याचा दावा करणाऱ्यांपासून सावध रहा.

रिलायन्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही सूचना जारी करण्यात आली आहे. यात रिलायन्स रिटेलने म्हटले की, आम्ही सध्या कोणतेही डीलरशीप अथवा फ्रेंचाईजी मॉडेल चालवत नसन, आम्ही कोणत्याही डीलरला देखील एजेंट म्हणून नियुक्त केलेले नाही. सोबतच आम्ही फ्रेंचाईजी नियुक्त करण्याच्या नावाखाली कोणतेही पैसे देखील घेत नाही.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, ठग जिओमार्टशी संबंधित असल्याचे सांगत बनावट वेबसाईट बनवत आहेत. कंपनीने फसवणूक करणाऱ्या काही वेबसाईट्सची यादी देखील दिली आहे. यात jmartfranchise.in, jiomartfranchiseonline.com, jiodealership.com, jiomartsfranchises.online, jiomartfranchises.com, jiomart-franchise.com, jiomartshop.info, jiomartindia.in.net, jiomartreliance.com, jiomartfranchise.co अशा काही वेबसाईट्सचा समावेश आहे.

रिलायन्स रिटेलने आपल्या ट्रेडमार्कचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि लोकांची फसवणूक रोखण्यासाठी कारवाई करण्याची देखील चेतावणी दिली आहे.