चीन-पाकिस्तानच्या कुरापतीवर लक्ष ठेवणार भारताचे ‘एवॅक्स’ सिस्टम


नवी दिल्ली – चीन आणि पाकिस्तानच्या वारंवार सुरु असलेल्या कुरापतींना लगाम घालण्यासाठी अखेर भारताने इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आकाशातील भारताचे नेत्र असे एवॅक्स सिस्टिमला म्हटले जाते. महागडया किंमतीमुळे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला एक अब्ज डॉलरचा हा करार रखडला होता.

रशियन बनावटीच्या इल्यूसीन-७६ विमानावर ही इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम बसवण्यात येणार आहे. इस्रायलबरोबर एवॅक्स सिस्टिमचा करार करण्यासाठी सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीची आंतरमंत्रालयीन समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मंजुरी मिळणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

या दोन नव्या फाल्कन सिस्टिमच्या समावेशानंतर भारताकडे असलेल्या एवॅक्सची संख्या पाच होणार आहे. आधीपासून अशा तीन सिस्टिम भारतीय हवाई दल वापरत आहे. आगामी तीन ते चार वर्षात इस्रायलकडून भारताला ही एवॅक्स सिस्टिम मिळणार आहेत. आधीपासून वापरात असलेल्या तीन फाल्कन एवॅक्स सिस्टिमपेक्षा अधिक अत्याधुनिक दोन नवीन फाल्कन असतील, असे सूत्रांनी सांगितले. बालाकोट एअर स्ट्राइक, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर झालेली डॉगफाइट आणि आता लडाख सीमारेषेवर चीन बरोबर निर्माण झालेला तणाव त्या पार्श्वभूमीवर आणखी एवॅक्स फाल्कन सिस्टिमची गरज आहे.