टीक-टॉकला खरेदी करण्याचा कोणताही विचार नाही, गुगलच्या सीईओंनी केले स्पष्ट

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर भारतात बंदी घातल्यानंतर अमेरिका देखील या अ‍ॅपवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, बाइटडान्सने टीक-टॉकचा अमेरिकेतील व्यवसाय 90 दिवसात विकावा अन्यथा बंदी घातली जाईल. यानंतर काही अमेरिकन कंपन्या टीक-टॉक खरेदी करण्यासाठी बाईटडान्सशी चर्चा करत असल्याचे देखील समोर आले होते. गुगलचेही नाव या चर्चेमध्ये होते. मात्र आता गुगल व अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगल टिक-टॉक खरेदी करण्याच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, गुगलचा टीक-टॉक खरेदी करण्याचा कोणताही विचार नाही. ते म्हणाले की, बाईटडान्सचा हा अ‍ॅप गुगलच्या क्लाउड सेवांचा वापर करण्यासाठी शुल्क भरते.

टीक-टॉकचे अमेरिकेत 10 कोटी युजर्स आहेत. मागील अनेक दिवसांपासून हे अ‍ॅप ट्रम्प सरकारच्या निशाण्यावर आहे. मात्र आता कंपनीने ट्रम्प प्रशासनाद्वारे निर्बंध घालण्याच्या आदेशाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.

सुंदर पिचाई म्हणाले की, महामारीच्या काळात अन्य तंत्रज्ञान कंपन्यांसोबतच टीक-टॉकची देखील वाढ झाली. अनेक अशा कंपन्या आहेत ज्या काळात पुढे आल्या आहेत. मोठ्या कंपन्या चांगले करत आहे. दरम्यान, आज टीक-टॉकचे सीईओ केव्हिन मेयर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.