आनंदवार्ता; मॉर्डनाची लस चाचणीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात


संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे सगळयांचेच जगणे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर अनेक देशात अद्यापही लॉकडाऊन असल्यामुळे उद्योगधंदे देखील पूर्णतः चालू झालेले नाहीत. त्यामुळे लोकांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत आहे, तसेच या लॉकडाउनमुळे जगभरात आतापर्यंत लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. सगळयाच देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. त्यातच जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होत असलेली वाढ ही संपूर्ण जगाची चिंता वाढवत असल्यामुळेच या रोगाचा नायनाट करण्यासाठी लस हा एकच पर्याय संपूर्ण जगासमोर आहे. जगातील संशोधक आणि शास्त्रज्ञ ही लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लसीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

त्यातच कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या मॉर्डना कंपनीकडून एक चांगली बातमी आली आहे. सध्या चाचणीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये मॉर्डनाची लस असून या लसीच्या अमेरिकेतील हजारो स्वयंसेवकांवर चाचण्या सुरु आहेत. मॉर्डनाच्या लसीने हा टप्पा पार केला तर लस निर्मितीचा मार्ग मोकळा होईल आणि जगासाठी ती एक मोठी दिलासादायक बातमी असणार आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अ‍ॅडव्हायजरी कमिटी ऑन इम्युनायजेशन प्रॅक्टिसेस समोर मॉर्डनाने बुधवारी फेज १ मधील अंतरिम डाटा सादर केला असून या डाटानुसार वयोवृद्धांमध्ये सुद्धा मॉर्डनाची लस प्रभावी ठरल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत.

कोरोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लसीचा डोस दिल्यानंतर तरुणवर्गाप्रमाणे वृद्धांमध्येही निर्माण झाल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ५६ ते ७० आणि सत्तरीच्या पुढे असलेल्या नागरिकांमध्ये १८ ते ५५ वयोगटाएवढीच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसून आल्याचे निरीक्षण मॉर्डनाने नोंदवले आहे.

या डाटामध्ये २० अतिरिक्त नागरिकांचे विश्लेषण असून लसीचे नेमके काय परिणाम वयोवृद्ध व्यक्तींवर झाले त्याची माहिती यात देण्यात आली आहे. फेज १ च्या ट्रायलमध्ये वृद्ध व्यक्तींच्या शरीरात व्हायरसला निष्क्रिय करणाऱ्या अँटीबॉडीजची मोठया प्रमाणावर निर्मिती झाल्याचे कंपनीने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. या अँटीबॉडीज व्हायरसपासून शरीराचा बचाव करण्यामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहेत.

प्राण्यावर मॉर्डनाच्या लसीची करण्यात आलेली चाचणीही यशस्वी ठरली होती. MRNA-1273 लसीची माकडांवर चाचणी करण्यात आली होती. त्यांना इन्फेक्शनपासून संरक्षण मिळाले तसेच प्राण्यांना फुप्फुसाचा कुठलाही आजार झाला नसल्याचे कंपनीने म्हटले होते. दरम्यान ऑक्सफर्ड आणि सिरम इंस्टि्टयूटने विकसित केलेली लसही चाचणीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्या भारतात कालपासूनच सुरु झाल्या आहेत. या लसीचा डोस काल पुण्यात दोघांना देण्यात आला.