परराष्ट्रमंत्र्यांची कबूली; लडाखमध्ये १९६२पेक्षा सर्वाधिक गंभीर परिस्थिती


नवी दिल्ली: १९६२पेक्षा गंभीर स्थिती लडाखमध्ये निर्माण झाली असून आतापर्यंतची ही लडाखमधील सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करुन तणाव दूर करण्यासाठी चीनने आवश्यक ते उपाय करावे, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

सैन्याच्या अभूतपूर्व हालचाली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला सुरू आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मान चीनने राखला नाही तसेच दोन्ही देशांनी परस्पर सामंजस्यातून घेतलेल्या निर्णयांचे आणि करारांचे पालन केले नाही. सैन्य बळ वाढवले असून भारताच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होईल अशा कृती सुरू केल्यामुळे आतापर्यंतची सर्वात गंभीर परिस्थिती लडाखमध्ये निर्माण झाल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या परिस्थितीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे त्यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजी फॉर अॅन अनसर्टन वर्ल्ड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याआधी एका विशेष मुलाखतीत बोलत होते. भारत तणाव दूर करण्यासाठी चीनसोबत लष्करी अधिकारी आणि मुत्सद्द्यांच्या (राजनैतिक अधिकारी) पातळीवर चर्चा करत आहे. पण चीनने तोडगा काढण्यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या करारांचे तसेच परस्पर सामंजस्यातून घेतलेल्या निर्णयांचे पालन करणे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मान राखणे आवश्यक आहे. चीनने तणाव निर्माण होण्याआधीच्या परिस्थितीसाठी सामंजस्य दाखवणे आवश्यक आहे. एकतर्फी आक्रमकता दाखवून तणाव निर्माण होण्याआधीच्या परिस्थितीची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मान चीनने राखला नाही. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात प्राणघातक संघर्ष झाला. भारताच्या एका कर्नलसह वीस सैनिकांनी हौतात्म्य पत्करले. चीनचे ३५ ते ४५ जण मारले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर परिस्थिती दिवसागणिक चिघळत आहे. भारत आणि चीनने रणनितीसाठी दीर्घकालीन धोरणांचा विचार करुन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले.

दोन्ही देश परस्पर चर्चेतून एकमेकांचे अनेक प्रश्न सोडवू शकतात. पण धोरणात्मक पातळीवर निर्णय घेण्याची यासाठी आवश्यकता आहे. चीनविषयी भारताच्या मनात विश्वास निर्माण होणे गरजेचे असल्याचेही परराष्ट्रमंत्री म्हणाले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, एक अब्जपेक्षा जास्त भारताची लोकसंख्या आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला देश जागतिक पटलावरचा एक प्रमुख देश असणे अपेक्षित आहे. सध्या भारताची त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे.

आपण एकविसाव्या शतकातील आव्हानांचा विचार करुन परराष्ट्र धोरण राबवत असून भारताची अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांसोबतची मैत्री दृढ होत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेसोबत वेगवेगळ्या पातळीवर परस्पर सामंजस्य निर्माण होत आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या गटांकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होत असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले.