पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार देवेंद्र फडणवीस-अजित पवार


पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर जाहीररित्या तिसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पुण्यात उद्या, शुक्रवारी कोविड सेंटरचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे दोन्ही राजकीय नेते त्या शपथविधीनंतर माढ्यात संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाला मुंबईत उपस्थित होते. आता ही तिसरी वेळ असून ज्यावेळी दोघे एकत्रित दिसणार आहेत.

अजित पवारांनी फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात जोरदार टोलेबाजी केली होती. आता पुण्यात या मंचावर उद्या दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पुणेकरांना कोरोना संकटाच्या काळात जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असून बाणेर येथे सीएसआरच्या माध्यमातून सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

270 ऑक्सिजन आणि 44 व्हेंटिलेटर बेड्स असे एकूण 314 बेड्सची या सेंटरमध्ये व्यवस्था आहे. ऑक्सिजनची कमी पडू नये, म्हणून 13 हजार लिटर क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक बसविण्यात आला आहे. तसेच बॅकअपसाठी 16 बाय 16 ऑक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, त्यासाठी शेड तसेच कॉम्प्रेसर व व्हॅक्युम पंप याची व्यवस्था केलेली आहे. वीजेच्या बॅकअपसाठी आयसीयु युपीएस व जनरेटर सुविधा करण्यात आली आहे.