या सरकारी कंपनीचे स्तुतीपर पाऊल, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना देणार 15 लाख

देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हजारो जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाना बिकट स्थितीतून जावे लागते. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोल इंडिया लिमिटेडने कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना 15 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. कंपनीने अधिकृत आदेशामध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीत या निर्णयावर मोहर लावली. कंपनीचे जवळपास 4 लाख स्थायी आणि कंत्राटावर कर्मचारी आहेत.  हा निर्णय 24 मार्च 2020 पासून लागू होईल.

याआधी कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले होते की, कोल इंडियाच्या कोव्हिड-19 मुळे प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कार्यस्थळावरील अपघात म्हणून ग्राह्य धरले जाईल व त्यांच्या कुटुंबाना भरपाई रक्कम दिली जाईल.