लॉकडाऊन दरम्यान औरंगाबाद जेलमधील कैद्यांना मिळाला रोजगार, विणल्या 2000 साड्या

औरंगाबादमधील कारागृहातील कैद्यांनी कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर जून महिन्यापासून आतापर्यंत 2000 साड्या विणल्या आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर या कैद्यांच्या हाताला रोजगार मिळाला. याबाबतची माहिती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, साड्या विणण्याचे काम कारागृहामध्ये पडून असलेल्या 5-6 जून्या वीजेच्या यंत्रमागावर करण्यात आले. यामुळे 25 कामगारांना रोजगार मिळाला. त्यांनी सांगितले की, या कामाबाबत 4-5 महिन्यांपुर्वी विचार करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान याबाबत विचार केला व जूनपासून साडी विणण्याचे काम सुरू झाले.

25 कैदी साड्या विणण्याचे काम करत असून, त्यांना दररोज 55 रुपये मिळत आहे. आतापर्यंत 2 हजार साड्या विणल्या आहेत. याआधी कैदी शर्ट, पँट आणि मास्क बनवत होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या या साड्या विक्रीसाठी नाही. कोव्हिड-19 महामारी नियंत्रणात आल्यानंतर साड्यांची विक्री सुरू केली जाईल.