केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती; टीबीग्रस्तांना कोरोनाचा दुप्पट धोका


नवी दिल्ली – टीबी म्हणजे क्षय रोगानेग्रस्त असलेल्या रुगांना कोरोनाची चाचणी करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिला असून याबाबत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार टीबी या आजाराने पिडीत असलेल्या लोकांना अन्य लोकांच्या तुलनेत कोरोनाचा धोका दुप्पट असतो. त्यासाठी टीबीची उपचार घेत असलेल्या सगळ्या रुग्णांची चाचणी होणे आवश्यक आहे.

दरम्यान एका संशोधनातून दिसून आले की, टीबीच्या रुग्णांना तसेच या आजारातून बाहेर आलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाचा जास्त धोका असतो. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील दिशानिर्देश जारी केले आहेत. टीबीच्या रुग्णांचा कोरोना संक्रमणादरम्यान धोका जास्त वाढतो. याशिवाय टीबीनेग्रस्त असलेल्या लोकांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांचे खाणे-पिणे, आहार, सवयी व्यवस्थित नसतात, तसेच ज्यांना धुम्रपानाची सवय असते अशा लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. परिणामी या व्हायरसचे संक्रमण जीवघेणे ठरू शकते.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार टीबी आणि कोविड १९ असे आजार आहेत ज्यात थेट फुफ्फुसांवर आक्रमण होते. आकडेवारीनुसार जानेवारी आणि जून महिन्यात कोरोनाच्या महामारीमुळे मागच्या वर्षांच्या तुलनेत मृत्यू होत असलेल्या टीबीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच असे स्पष्ट होत आहे की, टीबी असलेल्यांना या महामारीचा धोका जास्त आहे.