व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलचे मोठे नुकसान, 94 लाख ग्राहकांनी सोडली साथ

व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलला लॉकडाऊनच्या काळात मोठा झटका बसला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या दूरसंचार कंपन्यांची तब्बल 94 लाख ग्राहकांनी साथ सोडली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये टॅरिफच्या किंमती वाढल्यानंतर देखील अनेक ग्राहकांनी या कंपनीची सेवा वापरणे बंद केले होते. मात्र दुसरीकडे रिलायन्स जिओच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ट्रायद्वारे नवीन आकड्यांनुसार मार्च ते मे महिन्यामध्ये व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलची तब्बल 2 कोटी 68 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी साथ सोडली. तर याच कालावधीमध्ये रिलायन्स जिओशी 99 लाख 20 हजार ग्राहक जोडले. एकट्या मे महिन्यात व्होडाफोन – आयडिया आणि  एअरटेलचे 94 लाखांपेक्षा अधिक ग्राहक कमी झाले. मे महिन्यात 36 लाख 50 हजार नवीन ग्राहकांनी जिओची सेवा घेण्यास सुरुवात केली.

जिओप्रमाणेच बीएसएनएलचे ग्राहक देखील लॉकडाऊन दरम्यान वाढले. या काळात बीएसएनएलशी 2 लाख 76 हजार नवीन ग्राहक जोडले. मे महिना बीएसएनएलसाठी चांगला ठरला. मे महिन्यात बीएसएनएलला 2 लाख नवे ग्राहक मिळाले. लॉकडाऊनचा सर्वात मोठा धक्का व्होडाफोन-आयडियाला बसला आहे. तीन महिन्यांत कंपनीच्या एक कोटी 55 लाख 96 हजाराहून अधिक ग्राहकांनी सेवा सोडली. याच काळात एअरटेलचे 1 कोटी 12 लाख 74 हजाराहून अधिक ग्राहक कमी झाले.

ट्रायच्या आकड्यांनुसार देशात मोबाईल सेवा वापरणाऱ्यांची संख्या फेब्रुवारीपर्यंत 116 कोटी 5 लाख होती. ही संख्या कमी होऊन मे महिन्यात 114 कोटी 39 लाख झाली. ट्रायने देशाला 22 सर्कलमध्ये विभागले आहे. मे महिन्यात 22 पैकी 22 सर्कल्समधील ग्राहकांची संख्या कमी झाली. केवळ बिहार आणि केरळ सर्कलमधील संख्या वाढली. ट्रायनुसार, मेच्या अखेरीस जिओ 39 कोटी 27 लाख ग्राहक आणि 34.33 टक्के मार्कट शेअरसह आघाडीवर आहे. एअरटेलचे जवळपास 31 कोटी 78 लाख ग्राहक आणि व्होडाफोन-आयडिया जवळजवळ 30 कोटी 99 लाख ग्राहक आहेत.