संघाने मुखपत्राद्वारे साधला तुर्कीच्या लाडक्या आमिर खानवर साधला निशाणा


नागपुर – अभिनेता आमिर खानची तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांची पत्नी एमी एर्दोगान यांनी भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता आमिरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निशाणा साधला आहे. चीनमधील सत्ताधारी पक्षाचा आमिर खान हा लाडका असल्याचा टोला संघाने आपल्या मुखपत्रामधून लगावला आहे. तसेच आमिरच्या भारताविरोधात असणाऱ्या देशांबद्दल भूमिकेसंदर्भात प्रश्न या लेखामध्ये उपस्थित करण्यात आले आहे.

अभिनेता आमिर खानवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या पांचजन्यमधून टीका करण्यात आली आहे. या लेखमध्ये तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच चिनी कंपन्यांची जाहिराती आमिर करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आमिरच्या भूमिकेवर ‘ड्रॅगन का प्यार खान’ या मथळ्याखाली छापून आलेल्या लेखामधून टीका करण्यात आली आहे. देशभक्ती या विषयावर स्वातंत्र्याच्या आधी आणि त्यानंतरही चित्रपट निर्माण झाले. पण त्यानंतर चित्रपटांना पाश्चिमात्य संस्कृतीची हवा लागली आणि नेतृत्व करणारा चित्रपट संपला. देशभक्तीवर आधारित चित्रपटांची संख्या मागील पाच ते सहा वर्षांमध्ये पुन्हा एकदा वाढलेली दिसते. पण दुसरीकडे असे काही अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत ज्यांना आपल्या देशाबरोबर वैर असणारे चीन आणि तुर्कीसारखे देश जास्त आवडतात, अशा शब्दांमध्ये आमिरवर निशाणा साधण्यात आला आहे.

नुकतीच मुस्लिमांच्या उम्मांचा (माता) दूत बनण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तुर्कीच्या राष्ट्रपतींची पत्नी आणि आमिर खान यांची भेट झाली आणि या भेटीचे फोटो समोर आले आहेत, असा उल्लेख लेखामध्ये करण्यात आला आहे. एकीकडे चीनमध्ये इतर कलाकार आणि निर्माते अपयशी ठरत असतानाच आमिर खानचे चित्रपट भरपूर कमाई करताना दिसतात. चिनी व्हिवो मोबाइल कंपनीचा आमिर खान ब्रॅण्ड अँबेसेडर आहे. ही कंपनी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले असल्याचा उल्लेख लेखामध्ये आहे.

एखाद्या अभिनेत्याला भारतामध्ये लोक डोक्यावर घेऊन नाचतात आणि यशाच्या शिखरावर पोहचवतात तेव्हा त्याचा धर्म पाहिला जात नाही. लोक त्याच्या चित्रपटांवर खूप पैसे उधळतात. लोक त्याच्या धर्माची नाही तर त्याच्यातील कलाकाराचे कौतुक करत असल्याचेही या लेखामध्ये म्हटले आहे. पण अशी व्यक्ती जेव्हा देशातील लोकांना ठेंगा दाखवून त्यांच्या प्रेमाच्या मोबदल्यात ‘आधी धर्म नंतर देश’सारखी जिहादी विचारसरणी दाखवू लागतात किंवा थोड्या पैशांसाठी शत्रू देशाच्या इशाऱ्यावर नाचू लागतात, तेव्हा चीड येते. अशी व्यक्ती शत्रू राष्ट्रातील पाहुणचार निर्ल्जमपणे कबुल करु लागली तर देशातील लोकांनी त्यांची फसवणूक झाली असे समजावे का?, आजकाल चीन आणि तुर्कीचा लाडका ठरत असलेल्या आमिर खानच्या याच सर्व गोष्टींचा त्याच्या चाहत्यांना आणि सामान्य देशभक्तांना राग येत असल्याचेही लेखात म्हटले आहे.

चीनमध्ये आमिर खानचा दंगल चित्रपट भरपूर कमाई करताना दिसतो तर त्याच विषयावर असणारा सलमान खानचा सुल्तान मात्र फ्लॉप ठरला. असे का झाले असावे? असा प्रश्न या लेखामध्ये विचारण्यात आला आहे. आमिर खान स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानत असेल त्याने जम्मू-काश्मीरच्या विषयावर पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कीमध्ये चित्रिकरण करण्याचा विचार का केला. आमिरची ती मुलाखत लोक अजूनही विसरलेले नाहीत ज्यामध्ये त्याने, माझी पत्नी किरण रावला भारतामध्ये भीती वाटते आणि भारतात असहिष्णुता वाढत असल्याचे वक्तव्य केले होते. ज्या देशातील सरकार सत्तेत असताना सर्वाधिक पत्रकारांना अटक करण्यात आली आहे, ज्या देशामध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन ही सामान्य गोष्ट मानली जाते आणि सोशल नेटवर्किंगवर कधीही बंदी घातली जाते अशा देशाच्या इशाऱ्यावर आमिर खान चालत असल्याची टीका या लेखामध्ये करण्यात आली आहे.