पुण्यातील सहा स्वयंसेवकांना आज देण्यात येणार ऑक्सफर्ड-सिरमच्या लसीचा पहिला डोस


पुणे – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतातील सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने विकसित केलेल्या लसीची चाचणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली असून या लसीचे उत्पादन पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात झाले आहे. आज या लसीचा पहिला डोस पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये सहा स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. या चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून तीन पुरुष आणि महिलांची मंगळवारी तपासणी करण्यात आली. ऑक्सफर्डच्या लसीचा डोस त्यांचा RT-PCR आणि अँटीबॉडी चाचणीचा रिपोर्ट क्लियर असेल तर त्यांना देण्यात येईल.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय संचालक संजय लालवानी यांनी याबाबतची माहिती देताना इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, आम्ही या लसीची सहा जणांवर चाचणी करणार असून त्यांची तपासणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांची RT-PCR आणि अँटीबॉडी चाचणी देखील करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट अनुकूल आले तर लसीचा डोस दिला जाईल. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने बनवली असून ‘कोव्हिशिल्ड’ या नावाखाली भारतात या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटीश-स्वीडन फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेकासोबत देशात एक अब्ज लसीचे डोस बनवण्याचा करार केला आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने तीन ऑगस्ट रोजी सिरमला फेज २ आणि ३ ची मानवी चाचणी घेण्याची परवानगी दिली. भारतात या लसीची मानवी चाचणी एकूण १७ वैद्यकीय संस्थांमध्ये होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे चालवले जाणारे परेलमधील केईएम हॉस्पिटल आणि मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर हॉस्पिटलचा यामध्ये समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ऑक्सफर्डची लस यशस्वी ठरली असून धोकादायक कोरोना व्हायरपासून ही लस टोचल्यानंतर दुहेरी संरक्षण मिळू शकते, असे संशोधनातून समोर आले आहे. ही लस म्हणजे कोरोना विरोधात महत्त्वाचा शोध असल्याचे संशोधक मानत आहेत. लसीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजसोबतच किलर ‘टी-सेल्स’ची निर्मिती झाल्याचे दिसून आले.