ज्यांना कोरोना नाही अशा लोकांना चिनी टेस्ट कीटने दाखवले ‘कोरोनाबाधित’


स्वीडन – स्वीडन हा देश चिनी बनावटीच्या कोरोना टेस्ट कीटमुळे अडचणीमध्ये सापडला आहे. चीनमधून आयात करण्यात आलेले कोरोना टेस्ट कीट सदोष असल्याचे बुधवारी स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. या कीटच्या मदतीने ३७०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, पण सर्वचजण कोरोनाबाधित असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण हे लोक पूर्णपणे ठणठणीत असल्याचे नंतर उघड झाले. या रुग्णांच्या कोरोना चाचणीचे निष्कर्ष कोरोना चाचणी कीटमध्ये असणाऱ्या दोषांमुळे सकारात्मक आल्याची माहिती समोर आली आहे.

स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये कोरोनाची लागण न झालेल्या ३७०० रुग्णांवर कोरोना रुग्ण म्हणून उपचार केले जात असल्याची माहिती समोर आल्याचे स्वीडन सरकारने म्हटले आहे. यासंदर्भातील वृ्त डेली मेलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार चिनी बनावटीचे पीसीआर कोरोना चाचणी कीट सदोष असल्यामुळे या कीटच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्व चाचण्यांचे निकाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आले.

हा गोंधळ चीनमधील बीआयजी जेनोमिक्स कंपनीच्या या टेस्ट कीटमुळे निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये याच कंपनीचे कीट पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कीटच्या मदतीने चाचणी करण्यात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षण दिसून येत नव्हती. पण चाचणीचे निकाल सकारात्मक आल्याने हे असिम्पटोमॅटिक रुग्ण असल्याचे गृहित धरुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. स्वीडनमध्ये मार्च महिन्यापासून याच कीटच्या आधारे कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा याच चाचण्यांच्या आधारावर ठरवला जात असल्यामुळेच आता स्वीडनमधील आरोग्य खात्याने सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याचा विचार करत असून पुढील नियोजन करत आहे.

स्वीडनने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार कोरोनासारखी लक्षण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कोरोना चाचणी कीटच्या वापरामुळे कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. सर्दी किंवा ताप ज्या ज्या लोकांना आहे ते सर्व कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दाखवण्यात आले होते. पण या सर्दी आणि तापाची कारणे वेगळी असल्याचे नंतर स्पष्ट झाल्यामुळे आता आरोग्य विभागाने या लोकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या या ३७०० प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसंदर्भात चौकशी केली जाईल, असे स्वीडनने स्पष्ट केले आहे. युरोपियन युनियनच्या आरोग्य विभागाला आणि जागतिक आरोग्य संघटनेला या कोरोना कीटमध्ये असणाऱ्या दोषासंदर्भांतील आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती देण्यात असल्याचेही स्वीडनने म्हटले आहे.