केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केली NEET-JEE परीक्षांसाठीची राज्यनिहाय केंद्रांची यादी


नवी दिल्ली: कोरोनाच्या संकट काळात कोणत्याही परीक्षा न घेण्यासाठी होत असलेला विरोध डावलून नीट आणि जेईई (NEET-JEE) मुख्य परीक्षा आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई आणि नीट परीक्षांसाठी राज्यनिहाय केंद्राची यादी जारी केली आहे. शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीमध्ये जेईई परीक्षेसाठी 570 वरुन वाढवून 660 केंद्र केले आहेत, तर नीट परीक्षेसाठी 2846 वरुन वाढवून 3843 केंद्राची संख्या केली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबत जारी केलेल्या परिपत्रकानुसार एक ते 6 सप्टेंबर दरम्यान जेईई परीक्षा होईल, तर 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवण्यात आल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 करण्यात आल्या आहेत.

जेईई मुख्य परीक्षांसाठीचे अॅडमिट कार्ड देखील जारी करण्यात आली आहेत. त्याचबरोबर या आठवड्यात नीट 2020 परीक्षांसाठीचे अॅडमिट कार्ड देखील जारी होण्याची शक्यता आहे. अॅडमिट कार्ड रिलीज करतेवेळी एनटीएकडून सांगण्यात आले होते की, जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. नीट परीक्षा येत्या 13 सप्टेंबरला पार पडणार आहे. पण अद्यापही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. पण आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अॅडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर ntaneet.nic.in या वेबसाईटवरून हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.