
नवी दिल्ली – जीएसटी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री बैठकीत केंद्र सरकारवर टीका केली आहे. आपण नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचे केंद्र सरकारने सांगणे म्हणजे विश्वासघात असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक बोलावली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सोनिया गांधींचे मोदी सरकारविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले. सोनिया गांधींनी बैठकीत बोलताना सांगितले की, अर्थ स्थायी समितीच्या ११ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने यावर्षी आपल्याला १४ टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणे शक्य नसल्याचे सांगितले. हा नकार म्हणजे मोदी सरकारने केलेला विश्वासघात असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली. सोनिया गांधींनी पुढे बोलताना सागितले की, आपल्याला राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित घोषणांमुळे चिंता वाटली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या इतर समस्या आणि परीक्षा यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असून बेजबाबदारपणे हाताळले जात आहे.
सोनिया गांधी यांनी यावेळी सर्व राज्यांनी याविरोधात एकत्र आले पाहिजे, अशी विनंती केली. माझी विनंती आहे की, सर्वांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जाऊया आणि परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी, असे सोनिया गांधींनी यावेळी सांगितले.
