ज्यांना कोरोना प्रतिबंधक लस हवी आहे त्यांनाच माहिती देणार रशिया


जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस बनवल्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर या लसीकडून बऱ्याच देशांना अपेक्षा आहे. त्यातच ‘स्पुटनिक – व्ही’ ही लस मिळावी यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु असून भारत सरकारची रशिया बरोबर कोरोनावरील लसी संदर्भात चर्चा सुरु असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकतेच सांगण्यात आले आहे.

दोन्ही देश ‘स्पुटनिक – व्ही’ लसी संदर्भात परस्परांच्या संपर्कात असल्याचे कोरोना व्हायरसविषयीच्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. रशियाने कोरोना लसीबद्दल प्राथमिक माहिती दिली आहे. पण त्यांच्याकडून या लसीबाबतच्या सविस्तर सखोल माहितीच्या प्रतिक्षेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत रशियामध्ये ४० हजार लोकांवर ‘स्पुटनिक – व्ही’ लसीची चाचणी सुरु असून रशियाने मागच्याच आठवडयात जागतिक आरोग्य संघटनेसह भारताला या लसीची सर्व माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. या लसीमध्ये ज्या देशांना रस आहे, त्याच देशांना रशियाकडून सर्व माहिती देण्यात येईल.

रशिया कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी भारतासोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक असून रशियातील आरडीआयएफच्या सीईओंनी मागच्या आठवडयात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. रशियन लसीच्या उत्पादनासाठी लॅटिन अमेरिका, आशिया आणि मध्य पूर्वेतील अनेक देश इच्छुक असल्याचे दिमीत्रीव म्हणाले होते.

सध्याच्या घडीला लसीचे उत्पादन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतासोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गमालेयाने विकसित केलेली लस बनवण्याची क्षमता भारताकडे असल्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. या ज्या भागीदाऱ्या लस निर्मितीसाठी आहेत, त्यातूनच आम्हाला जितकी मागणी आहे, ती पूर्ण करता येईल, असे दिमीत्रीव यांनी म्हटल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले होते.

‘स्पुटनिक – व्ही’ लसीची निर्मिती करणाऱ्या संशोधन संस्थेच्या मॉस्कोमधील भारतीय दूतावास संपर्कात असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अंतिम मंजुरीचा टप्पा लसींनी पार केल्यानंतर लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन सुरु होईल. त्यावेळी या लसींसाठी वायल म्हणजे काचेची छोटी बाटली आणि सीरिंजची गरज लागेल. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांचे या वायल्स आणि सीरिंजच्या पुरवठयासाठी भारतीय कंपन्यांना करारबद्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महिन्याला लाखो वायल्सचा पुरवठा करण्यासाठी एका भारतीय कंपनीने या क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Schott कैशाशी संपर्क साधला आहे.