व्हायरल झालेल्या कोकणातील ‘त्या’ कन्येला पंतप्रधान मोदींनी दिला मदतीचा हात


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एका मुलीला इंटरनेट कनेक्शन आणि पुरेश्या सुविधा नसल्यामुळे ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. आता त्या फोटोची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असून त्यांनी या मुलीची मदत केली आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या मुलीचा एक फोटो व्हायरल होत होता. ही मुलगी या फोटोमध्ये एका छोट्या शेड वजा झोपडीमध्ये बसून अभ्यास करताना दिसून आली होती. सर्वच माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या झळकू लागल्यानंतर या मुलीला मदत करण्यासंदर्भातील सूचना पंतप्रधान कार्यालयाने संबंधित यंत्रणांना केल्या आणि या मुलीला अगदी इंटरनेट कनेक्शनपासून लॅपटॉपर्यंत सर्व सुविधात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असणाऱ्या विजया राहटकर यांनीही यासंदर्भातील माहिती फोटोसह ट्विटवरुन शेअर केली आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणामध्ये पुढील हजार दिवसांमध्ये देशातील प्रत्येक गावामध्ये ऑप्टिकल फायबर पोहचवण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन देशवासियांनी दिले होते. पण खरोखरच आपल्या गावामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल आणि आपला फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधानांकडून आपल्याला मदत मिळेल असा किंचितसाही विचार स्वप्नालीच्या मनीध्यानी नसेल. मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन लेक्चर्सला लॉकडाउनमुळे गावातच अडकलेल्या स्वप्नालीला उपस्थिती लावण्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. स्वप्नालीला लेक्चरला बसता यावे म्हणून तिच्या भावांनी घरापासून दोन किलोमीटर अंतरावर तिला एका टेकडीवर छोटी शेड तयार करुन दिली. त्यामध्ये बसून स्वप्नाली अभ्यास करायची आणि ऑनलाइन लेक्चरला उपस्थित रहायची. तिचा हाच फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

स्थानिक तसेच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी हा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्वप्नालीच्या जिद्धीची आणि इच्छाशक्तीची कथा देशासमोर समोर आणली आणि याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि भारत नेट खात्यामधील अधिकारी एका आठवड्यामध्येच स्वप्नालीच्या गावी पोहचले. त्यांनी थेट ग्रामपंचायतीपासून स्वप्नालीच्या घरापर्यंत इंटरनेटचे कनेक्शन दिले.

मुलीला अभ्यास करता यावा म्हणून थेट घरापर्यंत इंटरनेट कनेक्शन मिळाल्याबद्दल सुतार कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला असून त्याचबरोबर स्वप्नालीच्या फोटोवरुन तिची संघर्ष कथा मांडणाऱ्या प्रसारमाध्यमांबरोबरच सरकारी यंत्रणांचेही आभार मानले आहेत. मी सुरक्षितपणे आता घरातच अभ्यास करु शकते, असे स्वप्नालीने म्हटल्याचे ऑल इंडिया रेडिओने दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे.