पुढील महिन्यात या देशात एकत्रित युद्ध सराव करु शकतात भारतीय आणि चिनी लष्कर


नवी दिल्ली – जुन महिन्यात लडाखमधील गलवाण क्षेत्रात चीन लष्करासोबत झालेल्या चकमकीनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. त्याचबरोबर भारतातील घुसखोरी केलेल्या काही भागातून चीन मागे हटण्यास तयार नसल्यामुळे दोन्ही देशाचे लष्कर आमने-सामने येऊन ठकले आहेत. सीमेवर जरी तणावाची परिस्थिती असली तरी तरी पुढील महिन्यात रशियामध्ये होणाऱ्या युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारत आणि चीन दोन्ही देश आपले सैन्य पाठवू शकतात अशी माहिती या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिली आहे.

भारतात घुसखोरी केलेल्या लडाखमधील भागातून पूर्णपणे चीनने माघार घ्यावी, यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या भारत-चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झाल्या. पण अद्याप देखील कोंडी फुटलेली नाही. चीन व्यतिरिक्त भारताचा हाडवैरी असलेल्या पाकिस्तानचे लष्करही कावकाज-२०२० या युद्ध कवायतींमध्ये सहभागी होऊ शकते. या सरावामध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील सदस्य देशांसह एकूण अठरा देश सहभागी होण्याची शक्यता आहे.

भारत, चीन आणि पाकिस्तान तिघांसाठी तटस्थ ठिकाणी बहुदेशीय कवायतींमध्ये सहभागी होणे नवीन नाही. लडाख सेक्टरमध्ये चीन बरोबर तणाव असल्यामुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या या युद्ध कवायती महत्त्वाच्या असल्याचे, दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. १५ ते २६ सप्टेंबर दरम्यान रशियात होणाऱ्या या सरावासाठी भारत तिन्ही सैन्य दलातून मिळून १५० ते २०० सैनिक पाठवणार आहे. चीन आणि पाकिस्तानकडून किती सैन्य सहभागी होणार ते अद्याप समजू शकलेले नाही.