ड्वेन ब्रावोने रचला इतिहास, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने नवीन इतिहास रचला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा ड्वेन ब्रावो हा पहिला खेळाडू ठरला आहे. कॅरेबियन प्रिमियर लीग 2020 च्या 13व्या सामन्यात ब्रावोने सेंट लूसिया जूक्सच्या फलंदाज रखीम कॉर्नवॉलला आउट करत ही कामगिरी केली. ब्रावोने 459 टी20 सामन्यात 500 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये टी20 लीग आणि वेस्ट इंडिजसाठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे.

ड्वेन ब्रावोनंतर 390 विकेटसह लसिथ मलिंगा दुसऱ्या स्थानावर आहे. ड्रवेन ब्रावोने 500 विकेट्स घेण्याची कामगिरी क्वींस पार्क ओव्हल येथे पुर्ण केली. योगायोग म्हणजे हे तेच मैदान आहे जेथे वेस्टइंडिजचा महान गोलदांज कर्टनी वॉल्शने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 500 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

ड्वेन ब्रावोने टी20 करिअरमध्ये सर्वाधिक वेळा कायरन पोलार्डला आउट केले आहे. त्याने आतापर्यंत पोलार्डला 9 वेळा आउट केले आहे. टी20 मध्ये 500 विकेट घेण्यासोबतच ब्रावो कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये 100 विकेट्स घेणारा देखील एकमेव खेळाडू ठरला आहे. ब्रावो आतापर्यं जवळपास 21 वेगवेगळ्या संघांकडून टी20 सामने खेळला आहे.