4 महिन्यानंतर महिलेला पुन्हा कोरोनाची लागण, भारतातील असा पहिलाच रुग्ण!

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांच्या पुढे गेला आहे. आता एकदा संक्रमित होऊन बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. भारतात एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील महिलेला 4 महिन्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.

अहदाबादच्या 54 वर्षीय महिलेला पहिल्यांदा 18 एप्रिलला कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यानंतर आता 124 दिवसांनी पुन्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

महिलेचा 30 वर्षीय मुलगा हवाई दलात आहे. काही दिवसांपुर्वी तो, त्याची पत्नी आणि 3 वर्षांचा मुलगा दिल्लीवरून अहमदाबादला आले होते. यानंतर महिला आणि तिच्या मुलाला ताप आला. चाचणी केल्यावर दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

मुलाला अहमदाबादच्या डिफेंस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, महिलेला अहमदाबादच्या म्यूनिसिपल कॉर्पोरेशनच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल केले. कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिलेची अँटीबॉडी टेस्ट नेगेटिव्ह आली. यानंतर आरटीपीसी चाचणी केली. या महिलेचे नमुने पुण्यातील वायरोलॉजी लॅबमध्ये पाठवले आहेत. आयसीएमआरला देखील याची माहिती दिली आहे.