नेटफ्लिक्सच्या ‘या’ सीरिजविरोधात न्यायालयात पोहचला घोटाळेबाज मेहुल चोक्सी, प्रिव्ह्यू पाहण्याची केली मागणी

हजारो कोटींच्या घोटाळ्यांचा आरोपी असलेला मेहुल चोक्सी नेटफ्लिक्सची आगामी सीरिज ‘बॅड बॉय बिलिनियर्स’ विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही सीरिज 2 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. चोक्सीने न्यायालयात आवाहन केले आहे की सीरिज रिलीजच्या आधी त्याला याचा प्रिव्ह्यू दाखविण्यात यावा.

नेटफ्लिक्सनुसार, या आगामी सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे की कशाप्रकारे लालच, भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या माध्यमातून अनेक भारतीय उद्योगपती मोठे टायकून झाले आणि नंतर त्यांचे कशाप्रकारे पतन झाले. या सीरिजमध्ये विजय माल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीसह अनेक घोटाळेबाज उद्योगपतींची माहिती आहे.

सुनावणी दरम्यान न्यायालयात चोक्सीचे वकील म्हणाले की, आम्हाला सीरिज रिलीज होण्याआधी याचा प्रिव्ह्यू दाखविण्यात यावा, एवढीच आमची मागणी आहे. त्यांचे म्हणणे आहे की चोक्सीवर सध्या केस सुरू आहे. अशात सीरिजमुळे तपासावर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे नेटफ्लिक्सने न्यायालयात सांगितले की, संपुर्ण सीरिजमध्ये मेहुल चोक्सीबाबत केवळ 2 मिनिटांचा काँटेंट आहे. न्यायालयाने नेटप्लिक्सकडून उत्तर मागितले असून, पुढील सुनावणी 28 ऑगस्टला होणार आहे.

दरम्यान, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीची पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात चौकशी सुरू आहे. हा घोटाळा तब्बल 14 हजार कोटींचा आहे.