‘सोनिया गांधी पक्षासाठी आईसारख्या’, पत्र लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याने व्यक्त केली भावना

काँग्रेसच्या पक्षनेतृत्वात बदल करण्यासाठी 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. या पत्रावरून काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीत चांगलेच वादळ उठले. आता पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेले एम वीरप्पा मोइली म्हणाले की, जर सोनिया गांधींच्या भावना दुखापल्या गेल्या असतील तर त्याची आम्हाला खंत आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेले मोइली म्हणाले की, कधीही सोनिया गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले नाहीत. पत्र मीडियामध्ये लीक झाल्याची देखील आम्हाला खंत आहे. सोनियाजी या पक्षासाठी आईसारख्या आहेत. आम्ही आजही त्यांचा सन्मान करतो. त्यांना दुखावण्याचा काही प्रश्नच नाही. जर त्यांचा भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.

मोइली म्हणाले की, काँग्रेस कठीण काळातून जात आहे. आम्ही घाम, समर्पण आणि त्यागाने उभारलेल्या पक्षाला हरू देऊ शकत नाही.  आम्ही सोनियाजींचे बलिदान स्विकार करतो. त्या पद घेण्यासाठी इच्छुक नव्हत्या. मात्र त्यांनी काँग्रेस पक्षासाठी आपले आयुष्य दिले आहे.

ते म्हणाले की, आम्ही आजही त्यांना आमच्या आई, पार्टी आणि देशाचे नशिब निश्चित करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक मानतो. आदर कायम राहील, परंतु पक्षात नवीन उर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. आमच्या पत्राचा मुख्य उद्देश सर्व स्तरावर काँग्रेसमध्ये नवीन उर्जा निर्माण करणे हा होता. याचा अर्थ असा नाही की त्यांनी अध्यक्ष राहू नये. पुन्हा अंतरिम अध्यक्ष होण्यासाठी त्यांचे स्वागत आहे.