आजपासून १६०० जणांवर होणार ‘सीरम’च्या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी


पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला आजपासून सुरुवात करणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून ‘कोव्हिशिल्ड’ची सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्तीबाबतची निश्चिती करण्यात येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटीश-स्वीडन फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेकासोबत भागीदारी केली आहे. याबाबत माहिती देताना सीरम इन्स्टिट्यूटचे अतिरिक्त संचालक प्रकाशकुमार सिंह यांनी सांगितले की, केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेकडून आम्हाला सर्व प्रकारची मंजुरी मिळाली असून आजपासून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे मानवी चाचणीला सुरुवात करणार आहोत.

ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला ३ ऑगस्ट रोजी परवानगी दिली होती. १७ निवडक ठिकाणी या चाचण्या करण्यात येत आहेत. यात एम्स दिल्ली, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. या चाचणीत १८ वर्षांवरील १६०० नागरिक सहभागी होणार आहेत. या लसीची ब्रिटनमध्ये पाच ठिकाणी दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्याचेही दिसून आले आहे.