गांधी कुटुंबिय हेच काँग्रेसचे आधार कार्ड: संजय राऊत


मुंबई: मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गांधी परिवारावर स्तुतीसुमने उधळत गांधी कुटुंब हेच काँग्रेसचे आधार कार्ड असून राहुल गांधी यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि तेच काँग्रेसचे उत्तम नेतृत्व देऊ शकतात, असे म्हटले आहे.

गांधी कुटुंबाबाहेरील काँग्रेसचे नेतृत्व कोणी करावे अशी मागणी होत असेल तर सध्याच्या परिस्थितीत ती म्हणावी तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. काँग्रेस पुढे घेऊन जाऊ शकेल असे गांधी कुटुंबाव्यतिरिक्त सध्या कुणी दिसत नाही. राहुल गांधी यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये त्यांच्या नेतृत्वामुळेच काँग्रेसला सत्ता मिळाल्याचा दावाही राऊत यांनी केला.

पण संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर थेट भाष्य करणे टाळले. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील मतभेद हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. खरंतर काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. पण त्याची ताकद सध्या क्षीण झाली असून पक्षात विस्कळीतपणा आला आहे. त्यातून काँग्रेसला सावरण्याची गरज आहे. काँग्रेस हा गावागावात कार्यकर्ते असलेला, उत्तर, पश्चिम भारतापासून ईशान्येपर्यंत पसरलेला पक्ष आहे. केवळ अंतर्गत मतभेद संपवून पुढे जाण्याची गरज या पक्षाला असल्याचे राऊत म्हणाले.

काल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली तर एका क्षणात आम्ही त्या सूचनेचे पालन करू, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत राऊत यांना प्रश्न विचारला असता, जे वडेट्टीवारांच्या मनात आहे, ते राहुल गांधी यांच्या मनात सुद्धा नाही. राहुल गांधी यांच्याशी आमचे उत्तम संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.