आता विद्यार्थ्यांसाठी पुढे आला सोनू सूद, नीट-जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची केली विनंती

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात नीट-जेईई परीक्षा न घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील याचिका फेटाळली होती. याशिवाय सरकारने देखील ठरलेल्या तारखेलाच परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने देखील सरकारला या परीक्षा स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना संकटात कामगारांच्या मदतीसाठी पुढे आलेला सोनू सूद आता विद्यार्थ्यांसाठी पुढे आला आहे. सोनू सूदने ट्विट केले की, देशातील सध्याची परिस्थिती पाहता मी सरकारला विनंती करतो की नीट आणि जेईईची परीक्षा पुढे ढकलावी. सध्याच्या कोव्हिड-19 च्या स्थितीमध्ये आपण आवश्यक ती काळजी घ्यायला हवी व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये.

जेईई आणि नीटच्या परीक्षा स्थगित करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. याआधी देखील ही परीक्षा स्थगित करत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यंदा परीक्षा घेण्यात यावी असे स्पष्ट केले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील परीक्षा स्थगित करण्याची सरकारकडे मागणी केली आहे.