कोल्हापूरातील शिवसेनेच्या खासदारासह पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण


कोल्हापूर – कोल्हापुरातील आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून जिल्ह्यातील तीन आमदारांच्या मागोमाग आता एक खासदारही कोरोनाबाधित झाला आहे. सोमवारी रात्री शिवसेनेचे कोल्हापुरातील खासदार संजय मंडलिक यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचा देखील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही बाधित झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

तत्पूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे कोरोनावर उपचार घेत आहेत. तर, आमदार प्रकाश आवाडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.