शिवसेनेने केली चेतन चौहान यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी


लखनऊ – चेतन चौहान यांच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेश शिवसेनेने सीबीआय चौकशीची मागणी केली असून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचे निधन झाले होते. लखनऊच्या सरकारी रूग्णालयातून गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात चौहान यांना का हलविण्यात आले असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

यासंदर्भात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरुवातीला, लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे गुरुग्राममधील मेदांता या खाजगी रुग्णालयात चौहान यांना दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

लखनऊमधील एसजीपीजीआय रुग्णालयातून मंत्री चेतन चौहान यांना गुरुग्रामच्या मेदांता या खाजगी रुग्णालयात का दाखल केले गेले, एसजीपीजीआय या प्रतिष्ठित संस्थेवर सरकारचा विश्वास नव्हता का? असा सवाल शिवसेनेने निवेदनाद्वारे विचारला आहे.

चौहान यांनी एसजीपीजीआय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीवर नाराजी दर्शवली होती. रुग्णालयाच्या दोषी डॉक्टर व कर्मचार्‍यांवर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. राज्यातील दोन मंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर ही सरकार झोपा काढत आहे का, असेही या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी २ ऑगस्ट रोजी, उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचेही करोनाने निधन झाले आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सुनीलसिंह साजन यांनीही चौहान यांचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर एसजीपीजीआय रुग्णालयात उपचारात झालेल्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप केला होता.