शिबानी दांडेकरने उलगडले सुशांत सिंह मृत्यूप्रकरणातील ‘त्या’ मिस्ट्री गर्लचे रहस्य


गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात एका मिस्ट्री गर्लची चांगलीच चर्चा रंगली आहे. सुशांतच्या घरी जाताना एका व्हिडीओमध्ये ही मुलगी दिसून आली होती. सोशल मीडियावर तेव्हापासून या मुलीविषयी अनेक चर्चांना उधाण आले होते. ती शिबानी दांडेकर असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. पण शिबानी दांडेकरने या चर्चांवर मौन सोडल असून ती मी नव्हेच असे तिने म्हटले आहे.

याबाबतचा संताप शिबानी दांडेकरने ट्विट करत व्यक्त केला आहे. ही मुलगी मी नसल्यामुळे जरा सत्य जाणून घेतल्यानंतर एखाद्या गोष्टीवर व्यक्त व्हा, असे खडेबोलही शिबानीने नेटकऱ्यांना सुनावले आहेत. ती व्यक्ती मी नाही आणि सिमोनसुद्धा नाही. संशय घेण्यापूर्वी एकदा सत्य काय आहे ते जाणून घ्या. ही मुलगी सुशांत सिंह राजपूतची पीआर आणि अस्टिस्टंट राधिका निहलानी आहे. त्यामुळे अफवा पसरवणे बंद करा. खूप झाले. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही खोट्या आणि चुकीच्या गोष्टी पसरवाल, असे शिबानीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राधिका निहलानी सुशांतच्या निधनानंतर त्याच्या घरी गेली होती. पण तिला पोलिसांनी अडवले. याच दरम्यान, तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

राधिका निहलानी ही सुशांतची पीआर होती. सुशांतच्या थिंक इन फाऊंडेशनची ती सहसंस्थापक होती. त्याचबरोबर ती चित्रपट निर्माते आणि सीबीएसी प्रमुख पहलाज निहलानी यांची सून असल्याचे सांगितले जाते. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी राधिकाचीदेखील चौकशी झाली होती.