काहीही झाले तरी भारतालाच माझा कायम पाठिंबा; शोएबला सानियाने लग्नाआधीच केले होते स्पष्ट


नवी दिल्ली – पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर टेनिसपटू सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असते. पण याच सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचा नावलौकिक वाढवला आहे, हे आपल्याला नाकारुन चालणार नाही. सानियाने आजवर अनेक महत्वाच्या स्पर्धांची विजेतेपदे पटकावली. सानिया आणि शोएब यांचे २०१० साली लग्न झाले. स्पोर्ट्सकिडा या संकेतस्थळाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सानियाने आपल्या आणि शोएबच्या रिलेशनशिपवर भाष्य केले.

आमचे नाते खूप निखळ असून आम्ही दोघेही खूप मजा करत असतो. त्यातच माझ्याकडे बघितल्यानंतर अनेकांना असे वाटते की मी खूप बोलत असेन, पण मुळात असे काही नाही. माझ्यापेक्षा जास्त शोएब बोलतो. आमचे प्रोफेशन आम्ही कधीही नात्यात येऊ देत नाही. आम्ही दोघेही खेळाडू असून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही लग्नाआधी ज्यावेळी भेटायचो, मी एक गोष्ट त्यावेळी त्याला स्पष्टपणे सांगितली होती की काहीही झाले तरी माझा नेहमी पाठिंबा भारतालाच असेल, त्यावर तो म्हणायचा की माझी भारताविरुद्ध कामगिरी नेहमीच चांगली असते. शोएब गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे आणि त्याने आतापर्यंत जे काही साध्य केले आहे, त्याचा मला अभिमान असल्याचेही सानिया म्हणाली. शोएब आणि सानिया यांना दोन वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव इझान आहे.